मुंबई - ‘सिटी लिमोझिन’ चिटफंड घोटाळ्यात बनावट कागदपत्रं जमा करून गुंतवणूकदार असल्याचं भासवत न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी २९ जणांवर आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर अनेक बोगस गुंतवणूकदारांनी अर्ज केल्याचं लक्षात अालं अाहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अलीकडेच याप्रकरणी पोलिसांनी विकास म्हेत्रे आणि विलास दळवी या दोघांना अटक केली. तसंच या गुन्ह्यांत गुंतवणूकदारांना मदत करणारे महानगर दंडाधिकारी न्यायालयातील (किल्ला कोर्ट) दोन शिपाई अाणि एका क्लार्कलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. केशव सातपुते, शिपाई गोपाळ बागुल अाणि संतोष चव्हाण अशी या तिघांची नावं अाहेत.
काय आहे प्रकरण?
२०१० मध्ये ‘सिटी लिमोझिन’ कंपनीचा तब्बल ३८५ कोटी रुपयांचा चिटफंड घोटळा उघडकीस आला होता. या कंपनीत देशभरातील ७० हजारांहून अधिक जणांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे देण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर २०१० मध्ये खासगी समापन अधिकाऱ्यांची नेमणूक करत त्याला २०१२ मध्ये गुंतवणूकदारांचा परतावा देण्याचे आदेश दिले होते.
संधीचा केला दुरूपयोग
त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० हजार गुंतवणूकदारांना पुरावा म्हणून गुंतवणूक केल्याबद्दलची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पाठवण्यात आली. परंतु अनेक गुंतवणूकदारांचे पत्ते मिळत नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन दलाल रामदास यादव याने गुंतवणुकीची बनावट कागदपत्रे बनवून समापन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केली. मात्र पैसे मिळण्यास उशीर होत असल्यानं ते वारंवार समापन अधिकारी कार्यालयात तक्रार करत होते.
टक्केवारीचं आश्वासन
मात्र यादव यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रं जमा केल्याचं क्लार्क सातपुते आणि शिपाई गोपाळ व संतोष यांच्या लक्षात आलं. त्यानुसार तिघांनी यादवला चौकशीसाठी बोलावलं. या चौकशीत यादवनं तिघांना पैशांमध्ये टक्केवारी देण्याचे आश्वासन दिलं. अशाप्रकारे यादवने अन्य २६ जणांची कागदपत्रे समापन अधिकार्यालयात या तिघांच्या मदतीने घुसवली. प्रत्येक गुंतवणुकदारामागे या तिघांना २२ हजार रुपये मिळणार होते.
अखेर डाव फसला
मात्र वेळीच या चौकडीचा डाव समापन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी घडलेला प्रकार न्यायालयात मांडला. त्यानुसार न्यायालयानं या चौघांसह इतर २६ बोगस गुंतवणुकदारांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांनी २०१७ मध्ये गुन्हा नोंदवला होता. या गुह्यात २५ आॅगस्ट रोजी आझाद मैदान पोलिसांनी विकास म्हेत्रे आणि विलास दळवी यांना बोगस गुंतवणूकदार म्हणून अटक केली आहे. या आरोपींना पोलिसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
No comments:
Post a Comment