मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह आणि इतर ६ जणांना निर्दोष सोडताना न्यायालयाने काय म्हटले?
'दहशतवादाला धर्म नसतो पण...': मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह आणि इतर ६ जणांना निर्दोष सोडताना न्यायालयाने काय म्हटले?
स्फोटातील सहाही बळींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये भरपाई म्हणून देण्यात येतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील भिक्कू चौकाजवळ झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आणि शंभराहून अधिक जण जखमी झाले.
मुंबईतील विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयाने गुरुवारी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून २०१९ मध्ये भोपाळमधून भाजप खासदार झालेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना निर्दोष मुक्त केले.
२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिकमधील मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटारसायकलला बांधलेल्या स्फोटकाचा स्फोट झाल्याने सहा जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
'स्फोटातील सहाही बळींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना ५०,००० रुपये भरपाई म्हणून देण्यात येतील,' असे न्यायालयाने म्हटले आहे.
२०१८ मध्ये खटला सुरू झाल्यानंतर १९ एप्रिल २०२५ रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता.
• दहशतवादाला कोणताही धर्म नसतो कारण कोणताही धर्म हिंसाचाराचे समर्थन करू शकत नाही. न्यायालय केवळ धारणा आणि नैतिक पुराव्याच्या आधारे कोणालाही दोषी ठरवू शकत नाही; त्यासाठी ठोस पुरावे असले पाहिजेत.
• दुचाकीवर बॉम्ब ठेवल्याचा कोणताही पुरावा नाही. श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटके साठवल्याचा किंवा एकत्र केल्याचा कोणताही पुरावा नाही.
• मोटारसायकलचा चेसिस नंबर पुसून टाकण्यात आला होता आणि इंजिन नंबर संशयास्पद आहे. साध्वी (प्रज्ञा ठाकूर) ही गाडी मालक असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही आणि तिच्याकडे गाडी होती हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही. स्फोटापूर्वी ती गाडी साध्वी प्रज्ञा यांच्या ताब्यात होती हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही.
• श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटके साठवल्याचा किंवा एकत्र केल्याचा कोणताही पुरावा नाही.. पंचनामा करताना तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे कोणतेही रेखाचित्र तयार केले नाही. घटनास्थळाचे फिंगरप्रिंट, डंप डेटा किंवा इतर काहीही गोळा केले गेले नाही. नमुने दूषित होते, त्यामुळे अहवाल निर्णायक असू शकत नाहीत आणि ते विश्वसनीय नाहीत.
• नियमांनुसार मंजुरी घेण्यात आली नसल्याने या प्रकरणात UAPA लागू केला जाणार नाही. या प्रकरणात UAPA चे दोन्ही मंजुरी आदेश सदोष आहेत.
• अभिनव भारत संघटनेचा वापर अभियोग पक्षाने सामान्य संदर्भ म्हणून केला. दहशतवादी कारवायांसाठी अभिनव भारतचा वापर झाल्याचा कोणताही पुरावा नाही. ठोस साक्षीदारांनी अभियोग खटल्याला पाठिंबा दिलेला नाही. (षड्यंत्र रचण्यासाठी) बैठका झाल्या हे सिद्ध करण्यात अभियोक्ता पक्षाला अपयश आले आहे.
स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला, परंतु १०१ जण जखमी झाल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला. न्यायालयात सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांपैकी काही जणांमध्ये फेरफार करण्यात आल्याने केवळ ९५ जणांना झालेल्या दुखापती मान्य केल्या.